औरंगाबाद - गायछाप विकत घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दारुच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात मुसळ घातले. रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या पत्नीला एकटेच सोडून पती ज्ञानेश्वर वाघ फरार झाला. ही घटना औरंगाबाद शहरातील ब्रिजवाडी येथे घडली आहे.
काय आहे प्रकरण
ब्रिजवाडी या
कामगार वस्तीत राहाणाऱ्या ज्ञानेश्वर वाघ (३१) याने मंगळवारी रात्री गायछाप विकत
घेण्यासाठी पत्नी जयश्री वाघ (२७) हिला पैसे मागितले. कामधंदा न करता घरात बसून
राहाणाऱ्या दारुड्या पतीला जयश्रीने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे चिडलेल्या
ज्ञानेश्वरने जयश्रीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पत्नी पैसे देत नसल्याने
संतापलेल्या ज्ञानेश्वरने शेजारी पडलेली मुसळ उचलून जयश्रीच्या डोक्यात घातली.
एकाच फटक्यात जयश्री खाली पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त वाहायला लागले. पत्नीला
रक्ताच्या थारोळ्या सोडून ज्ञानेश्वरने तिथून पोबारा केला.
दोन मुलांची आई
असलेली जयश्रीची मुले तेव्हा बाहेर खेळत होती. मुले घरात आल्यानंतर आई रक्ताच्या
थारोळ्या पडलेली पाहून मुलांनी आरडाओरड केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी जयश्रीला घाटी
हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.













